Tuesday, February 16, 2016

डोके नसलेल्यांनी डोके असलेल्यांवर लादलेली हेल्मेटसक्ती!

राज्य सरकारने नुकतीच हेल्मेटसक्ती जाहीर केली आणि पुणे व इतर काही शहरांत ती लगेच लागूही केली. हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या पुणेकरांवर प्रच्छन्न टीकाही झाली. परंतु, मुळातच अपघातांची कारणे आणि ही हेल्मेटसक्ती ह्यांचा संबंधच नसल्याने ही हेल्मेटसक्ती अनावश्यक व अव्यवहार्य कशी आहे ते सांगणारा, दुसरी बाजू मांडणारा हा लेख. हा लेख मी पत्र म्हणून लोकसत्ताकडे पाठवला होता; पण तो प्रसिद्ध झाल्याचे दिसले नाही. महाराष्ट्र टाईम्स च्या फेसबुकवरील पेजवर मी हा लेख टाकला आहे.

-- मंदार र. उपाध्ये.



keywords : pune maharashtra road traffic helmet compulsion

Wednesday, April 25, 2012

पुणें आणि पाणी

पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर पुणे महानगरपालिकेची स्थिती "लोका सांगे ब्रह्मज्ञान..."  अशीच झाली आहे. स्वतः अनेक मार्गांनी पाणी वाया घालवणारी महानगरपालिका पुणेकरांना मात्र पाणी वाचवण्याचे फुकाचे सल्ले निलाजरेपणाने देत आहे.

पुण्याच्या पाण्याचे काही तरी नियोजन पालिकेने केले आहे काय? गेली अनेक वर्षे पुणे राक्षसी वेगाने वाढत असताना पालिकेकडे ह्या शहर लोकसंख्या वाढीचे काही आकडे आहेत काय? त्यावरून ह्यापुढील वाढीचा अंदाज त्यांनी बांधला आहे काय? त्या अंदाजावर विसंबून, पुढची १० वर्षे वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे पाणी कसे उपलब्ध करायचे ह्याची काही योजना तयार आहे काय? असल्यास, पाणी-समस्या प्रत्यक्षात सुटण्यासाठी पालिकेने ती योजना (निदान काही प्रमाणात) अंमलात आणली आहे काय? ह्या प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी असतील तर पालिकेच्या सल्ल्यांना वरील विशेषणे चोख लागू पडतात!

खडकवासल्यापासून कालव्यातून पाणी शहरात येताना त्यातून पाणी वाया/चोरीस जात नाही असे महापालिकेचे म्हणणे आहे काय?

टन्कर (Tanker - ह्या Editor मध्ये हा शब्द ह्याहून अधिक वाईट पद्धतिने  नाही लिहिता येत!)  आणि नगरसेवक ह्यांचे "अद्वैत" तर सर्वज्ञात आहे. कित्येक नगरसेवकांचे स्वतःच्या मालकीचे Tanker आहेत. व अनेक प्रभागांत केवळ ह्या कारणामुळे पालिकेचे पाणी (नळाद्वारे) पोहोचलेले नाही असे
 ऐकिवात आहे.

Tanker मधून पाण्याची चोरी :  अगदी नुकतीच "सजग नागरिक मंच" ने पटवर्धन बागेसारख्या ठिकाणी पालिकेच्या पाणी भरणा केंद्रावर अनधिकृत Tanker द्वारे होणारी पाणी चोरी विडिओच्या पुराव्यानिशी पकडली आहे. त्यानुसार दररोज किमान सुमारे १ लाख लिटर पाण्याची चोरी पालिकेच्याच भरणा केंद्रांवर होत असावी! पालिका प्रशासनाला हे चोर कोण आहेत ते माहिती नाही असे मानणे खूपच अवघढ आहे!

ह्याशिवाय अनेक व्यावसायिकांना दिलेल्या अनधिकृत पाण्याच्या जोडण्या व सार्वजनिक ठिकाणी होणारी पाण्याची गळती ह्या बाबी वेगळ्याच!!

ह्या सर्व गळती/चोरीची गोळाबेरीज हा चिंता करण्याजोगा मोठा आकडा असेल ह्यात शंका नाही. ते सर्व सोडून, आधी हे प्रकार थांबवण्याऐवजी लोकांना उपदेश करायचा व स्वतःचे नियोजनातील अपयश झाकण्यासाठी "पुणेकर काय! ते रोज दोन-दोनदा अंघोळ करतात!" असा धादांत खोटा अप-प्रचार करायचा हा ढोंगीपणा आहे!

मग पाणी-टंचाई काय फक्त ह्याच कारणांमुळे झाली? नाही! असे आम्हाला अजिबात म्हणायचे नाही. पाणी टंचाईला हे सगळे आणि इतरही काही घटक कारणीभूत आहेत. काही लोक पाणी नासतात हे खरे आहे. पण म्हणून सरसकट सर्वच पुणेकर २ वेळा आंघोळ करतात हा दावाही बिनबुडाचा आहे. मी स्वतः गेली अनेक वर्षे नळ अर्ध्यापेक्षाही कमी सोडून वापरतो व एरवीही पाणी जपून वापरतो. असे अनेक जण पाणीवापराविषयी जागरूक आहेत.  पण तरीही एकंदरीत लोकांमध्ये पाणी काटेकोरपणे जपून वापरण्याची प्रवृत्ती कमी आहे हे देखील मान्य. पण त्यालाही एक प्रकारे पालिकाच कारणीभूत आहे. एके काळची मीटर पद्धत बंद करून पालिकेने सरसकट पाणीपट्टी लागू केली. त्या-ऐवजी सरासरीपेक्षा जास्त वापरावर वाढीव दर लावला असता तर आपोआप लोकांच्यात पाणी जपून वापरण्याची प्रवृत्ती निर्माण झाली असती. सरसकट पाणीपट्टी आकारणीमुळे त्याच्या अगदी उलट परिणाम झाला.


पालिका काय किंवा लोक काय - धुतल्या तांदळासारखे कोणीच नसायचे. (आता पाणीटंचाईमुळे तांदूळ देखील किती धुता येतील हा एक प्रश्नच आहे!). तेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी  प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून स्वतःत सुधारणा करावी हे उत्तम. पण पालिकेवर लोकांची जबाबदारी आहे. अशी जबाबदार संस्था जेव्हा स्वतःच्या (गैर)कारभाराबाबत मुग गिळून  लोकांना उपदेश करते तेव्हा बोलणे भाग आहे.

पाणी ही प्राथमिक गरज आहे. आणि पिण्यायोग्य पाणी हा जनतेचा अधिकार आहे. पाणी-टंचाईच्या नावानी आरडओरडा करण्यापूर्वी पालिकेने वर उल्लेख केलेली चोरी व गळती थांबवावी. तसेच लोकांनीही पाणी वाया घालवू नये (याबाबतीत इस्राएलसारख्या देशांचा आदर्श घेण्यासारखा आहे). पाणी-टंचाईचे खरे स्वरूप व आवाका तेव्हाच कळेल.

हे सर्व प्रकार बघता पाणी टंचाई खरी किती आणि खोटी किती असाही प्रश्न मनात येतो. पण काही अंशी तरी ती नक्की खरी आहे. तसेच पालिकेला खरोखरच इच्छा असेल तर टंचाई दूर करण्याचे मार्गही  अनेक आहेत. हा, आता नगरसेवकांचे पाणी-पुरवठ्याचे व्यवसाय तेजीत चालावेत म्हणून निर्माण केलेला हा बागुलबुवा असेल तर बोलणेच खुंटले. पण पुणेकर दुधखुळे नाहीत व हे धंदे फार काळ चालणार नाहीत हे निश्चित. तसेच पाण्यासाठी पुणेकर जनता खरोखरच रस्त्यावर आंदोलनास उतरली तर कोणाच्या तोंडचे पाणी पळेल ह्याचाही पालिकेने आणि नगरसेवक मित्रांनी विचार करून ठेवलेला बरा!



मंदार र. उपाध्ये
सोमवार । वैशाख शु।। २ १९३४  । २३ एप्रिल २०१२  । पुणें


संदर्भ व संबंधित वृत्त:
http://epaper.loksatta.com/34014/loksatta-pune/19-04-2012#page/13/1 
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-04-10/pune/31318253_1_water-supply-major-leakages-water-crisis
http://www.dnaindia.com/mumbai/report_tanker-mafia-fooling-thirsty-puneites_1666732

Keywords: pune pmc municipal corporation water crisis tanker
  

Tuesday, September 23, 2008

PMC's "ongoing" roadwork in Pune

This is an article written about PMC (Pune Municipal Corporation)'s horrible handling of the roadwork in various suburban areas of Pune city.

-- Mandar R. Upadhye.



keywords : pune pmc roadwork municipal corporation mahanagarpalika raste